<p>मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल संपूर्ण शहरात मतदान पार पडलं. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक नव्हे, तर राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरणार आहे. आज कोण जिंकणार, कोणाला धक्का बसणार आणि मुंबईचा कारभार कोणाच्या हाती जाणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीनं आढावा घेतलाय. आता नायगाव येथील प्रभाग क्रमांक 200 येथील मतदान मोजणी सुरू झालीय. या मतमोजणी केंद्रावर 200 ते 206 प्रभागातील मतदानाची मोजणी होणार आहे. काल सकाळी 7.30 वाजल्यापासून मुंबईतील 227 प्रभागांमध्ये मतदान झालंय. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 52.94 टक्के मतदान झालं. मुंबईभरात 23 मतमोजणी कक्षात 2 हजार 299 अधिकारी-कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेत. आधी पोस्टल मतदानाची मोजणी पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या विविध केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार असून टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतील. दुपारनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त लावण्यात आला असून, मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आलाय. तसेच आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय. 2 हजार 299 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. यामध्ये 759 पर्यवेक्षक, 770 सहायक तसेच 770 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा समावेश आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती झाल्या. अनेक प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांमध्ये प्रमुख लढती झाल्या. तर काही ठिकाणी एमआयएमएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे अस्तित्व देखील ठळकपणे जाणवले. आज होणाऱ्या मतमोजणीनंतर दुपारपर्यंत मुंबईतील सर्व प्रभागांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. नक्की कोणाचे पारडे जर ठरते आणि कोणाची सत्ता मुंबईत येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. </p>
