<p>रायगड - पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे विभागातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कामोठ्यात लवकरच अत्याधुनिक अग्निशमन केंद्र आणि CBSE पॅटर्नची शाळा उभारण्यात येणार आहे. येत्या पाच दिवसांत या दोन्ही महत्त्वाच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची ग्वाही भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास घरत यांनी दिली आहे.<br>निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना विकास घरत यांनी सांगितलं की, कामोठे विभागात स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, रस्त्यांची स्थितीही समाधानकारक आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळं अग्निशमन केंद्र आणि दर्जेदार इंग्रजी माध्यमाची शाळा ही काळाची गरज बनली होती. आता ही दोन्ही कामं प्रत्यक्षात उतरणार असून, आज निवडणूक संपली आणि उद्यापासून नव्या जोमाने विकासकामांना सुरुवात करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.</p>
