<p>धुळे - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रभागनिहाय मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच भाजपाचे वर्चस्व दिसून आले. मतदानाआधीच चार जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान झालेल्या जागांच्या मतमोजणीतही भाजपाचा विजयी रथ कायम राहिला. अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे संपूर्ण पॅनल विजयी झाले. काही ठिकाणी विरोधकांनी चुरशीची लढत दिली, मात्र निर्णायक क्षणी बाजी मारण्यात ते अपयशी ठरले. निकालाअंती भाजपाने ५० जागांवर विजय मिळवत महापालिकेतील सत्ता पुन्हा आपल्या हाती घेतली.</p><p>पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया - महानगरपालिकेत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं पन्नास जागा जिंकून आणत दणदणीत विजय मिळवला आहे. धुळे महानगरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या वयाची पन्नास वर्षे पूर्ण करत असताना माझ्या नेतृत्वाखाली 50 जागांवर भाजपाच्या नगरसेवकांना दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी संपूर्ण जनतेचा मनापासून आभार मानतो, अशी भावनात्मक प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली.</p>
