<p>पुणे : प्रतिवर्षाप्रमाणं यंदाही माघी गणेश जयंती निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची आरास आणि विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता सुवर्णपाळण्यामध्ये होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गणेशजन्म सोहळा निमित्ताने पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला आहे. याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरू असणार आहे. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी बाराला सुरूवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. गणेशजन्म सोहळ्यावेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. </p>
