रायगड : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अत्यंत भक्तीभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्याची आज (25 जानेवारी) मोठ्या उत्साहात सांगता झाली. ढोल-ताशे, हलगीच्या निनादात आणि "छत्रपती संभाजी महाराज की जय"च्या गजरात संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला होता. ऐतिहासिक किल्ला रायगड पुन्हा एकदा स्वराज्यकालीन वैभवाची साक्ष देत होता. या राज्याभिषेक सोहळ्यास मंत्री भरत गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पंचामृत अभिषेक, सप्तसिंधूंच्या पवित्र जलाने स्नान, पुष्पवृष्टी तसंच चलनी नाण्यांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधीवत पूजा करून महाराजांच्या प्रतिमेचे मंचावर भव्य स्वरूपात प्रतिष्ठापन करण्यात आले. यानंतर पारंपरिक वेशभूषेत सजवलेल्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या पालखी मिरवणुकीत शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, युवक-युवती आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
किल्ले रायगडावर आज इतिहास जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संभाजी महाराजांच्या शौर्याला, त्यागाला आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला उपस्थित शिवप्रेमींनी मानवंदना दिली.