<p>पुणे: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक मिळालेल्या पोलीस अधिकारी यांचा सन्मानदेखील करण्यात आला. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानातील मूल्ये, लोकशाही परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी कर्तव्यभावनेनं योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचं निरीक्षण केलं. यावेळी शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. </p>
