<p>पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "अजितदादा हे निर्भीड, स्पष्टवक्ते आणि ठाम भूमिका घेणारे नेतृत्व होतं. कार्यकर्ता हा त्यांच्या दृष्टीनं कधीच दूरचा नव्हता. प्रत्येक जण त्यांना घरातल्या व्यक्तीसारखा वाटायचा. आज त्यांच्या जाण्याच्या बातमीनं आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. कठीण निर्णय घेण्याची हिंमत, प्रशासनावरची पकड आणि थेट संवाद हे दादांचे प्रमुख गुण होते. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. स्पष्ट बोलणं आणि स्पष्ट निर्णय घेणं हीच त्यांची ओळख होती," अशी भावना योगेश बहल यांनी व्यक्त केली.</p>
