<p>पुणे- राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील महापालिकेच्या निवडणुकीप्रमाणे काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. तर काही ठिकाणी वेगवेगळे लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. "काही जिल्ह्यात दोन्ही पक्षातील लोकांची आम्ही एकत्रित घेत बैठक घेतली होती. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी एकत्रित लढायचं असल्याचं सांगितलं. तर काही तालुक्यात वेगवेगळेदेखील लढणार आहोत. महापालिकेच्या चर्चेबाबत खूप उशीर झाला होता. मात्र, वेळ कमी असला तरी ज्यांची जशी मानसिकता झाली, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल".</p>
